भोवरा,खुरपं आणि माऊस
₹250.00 Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00.
कवी- प्रदीप देशमुख
मूल्य : 250 रुपये
पाने :96
प्रकाशक : स्तंभ पब्लिशिंग हाऊस
प्रदीप देशमुख यांच्या कवितेतील भावविश्व हे श्रमिक व कष्टकऱ्यांच्या जगाशी अतूटपणे निगडित आहे. त्यामुळे कालच्या आणि आजच्या ग्रामीण जीवनातील जाणीवजगत या कवितेच्या केंद्रस्थानी येते. कष्टकऱ्यांच्या घामाच्या थेंबांबरोबरच मातीच्या सृजनशीलतेची विविध रूपे या कवितेतून प्रभावीपणे आविष्कृत झाली आहेत. मात्र या सर्जनशील मातीबरोबरच तिच्यापासून अलग झाल्याची आणि दुरावल्याची तीव्र भावना कवितेत गडदपणे व्यक्त होते. ‘येता गावाची आठवण, मन भिंगरी-भिंगरी होई’ या ओळींतून गतस्मरणाचा हळवा सूर प्रकटतो. वर्तमानकाळात भूमीप्रेमाचे संचित हरवल्याची दुखरी जाणीवही कवितेच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे ‘जखमी माती’ ही प्रतिमा प्रभावीपणे साकार होते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने जागतिकीकरण म्हणजे अगतिकीकरण असल्याची भावना या कवितेत व्यक्त होते. एक अर्थाने भुईतृष्णा आणि आधुनिक काळातील मातीच्या पडझडीची विदारक रूपे येथे उलगडतात. कधी काळी समृद्ध असलेली भूमीपरंपरा आज कडेलोटाच्या टोकावर उभी असल्याची जाणीव कविता ठसठशीतपणे करून देते. या कवितेत मातापित्याच्या हृद्य भावछटा समर्थपणे व्यक्त झाल्या असून, प्रादेशिक शब्दकळेचा गोडवा आणि मृदुता यामुळे काव्यभाषा अधिक रसाळ झाली आहे. त्याचबरोबर ना. धों. महानोर यांच्या कवितेच्या प्रभावखुणाही जाणवतात. कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयीच्या प्रागतिक दृष्टीमुळे या कवितेचा धागा कवी केशवसुत, विंदा करंदीकर आणि नारायण सुर्वे यांच्या काव्यपरंपरेशी जुळणारा आहे.
मात्र कवितेत विचारप्रकटीकरणाला अधिक प्राधान्य दिल्यामुळे काही ठिकाणी तिचे रूप वक्तृत्वप्रधान आणि विधानस्वरूपी झाल्याचे दिसते. तरीही एकंदरीत आजच्या काळातील कष्टकऱ्यांच्या जीवनाविषयीचा गडद आस्थाभाव आणि ‘कौन ठगवा नगरीया, लुटल हो’ असा अस्वस्थ करणारा भाव समर्थपणे व्यक्त करणारी ही कविता ठरते.
— प्रा. रणधीर शिंदे

Reviews
There are no reviews yet