स्तंभ पब्लिशिंग हाऊस विषयी

'स्तंभ पब्लिशिंग हाऊस' ही प्रगतशील विचारसरणी, सामाजिक बांधिलकी आणि वाङ्मयीन गुणवत्तेला प्राधान्य देणारी एक संवेदनशील व जबाबदार प्रकाशन संस्था आहे. मराठी साहित्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन, तळागाळातील ज्ञान, अनुभव आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांना विचारपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

प्रतिष्ठित व प्रथितयश लेखकांसोबतच नव्या पिढीतील आश्वासक लेखकांच्या साहित्याला आम्ही समान महत्त्व देतो. विशेषतः वंचित, दुर्लक्षित व उपेक्षित घटकांतील साहित्याचा शोध घेऊन, दर्जात्मक व मूल्याधिष्ठित साहित्यनिर्मितीला चालना देण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. कोणत्याही गटातटात किंवा संकुचित चौकटीत आमची अभिव्यक्ती मर्यादित न ठेवता, विचारस्वातंत्र्य, सामाजिक भान आणि मानवी मूल्ये यांचा सन्मान करणाऱ्या प्रत्येक चांगल्या लेखनाचे आम्ही मनापासून स्वागत करतो.कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, बालसाहित्य, वैचारिक साहित्य, समीक्षा, आत्मकथन तसेच अनुवादित साहित्य या विविध साहित्यप्रकारांत दर्जेदार पुस्तके प्रकाशित करून लेखकांच्या साहित्याला योग्य न्याय देणे ही आमची भूमिका आहे. साहित्य हे केवळ करमणुकीचे साधन न राहता ते संविधानिक नैतिकता, सामाजिक समता, मानवी हक्क आणि पर्यावरणीय जाणिवा यांचे संवर्धन करणारे प्रभावी माध्यम ठरावे, असा आमचा ठाम विश्वास आहे. स्तंभ पब्लिशिंग हाऊस ही प्रकाशन संस्था विचार, संवेदना आणि परिवर्तन यांचा वाड्मयीन गुणवत्तेने मराठी साहित्यात सशक्त स्तंभ उभा करण्याचा आमचा मानस आहे.