समीक्षा

किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते-श्रीकांत साहेबराव देशमुख

चंद्रपूरच्या कालच्या भेटीत गवसलेली, येत्या संग्रहात येणारी ही फार वेगळी कविता. किशोर कवठे सारखा कवी जे लिहून जातो ती भयंकर अस्वस्थ काळाची भाषा असते ! कवीने अशी कविता लिहिणे म्हणजे भयंकराचे साक्षातीकरण ! तो मला कालच्या गर्दीत भेटला, पिशवी हाती दिली. त्याच्या चेहऱ्यावरून तो इतका ‘दगाबाज’ असेल असे नव्हते वाटले.
शुभेच्छा किशोर !

१.
विझू नये दिवा,कुण्या दारातला
जरी हा मातला, अंधकार ।
जन्मा येतो रिते, जाईन अबोल
आयुष्य खगोल, आकळेना ।
बांधलेले हात, शिवलेले ओठ
असा गृहपाठ, नको आता ।
निरभ्र आकाश, होईल रे फळा
लिहू कळवळा, माणसांचा ।

२.
घरातली रद्दी बांधताना
सहज तरारून गेला नागेशचा चेहरा तो रोज यायचा आमच्या गल्लीत

प्रेसवाल्याचे शटर कायम बंद दिसतेय मला
बँकेने जप्ती आणल्यागत

घरकाम करणाऱ्या बाईला दिली पगारी रजा
तिची कळली नाही हालचाल अजूनही

रशीद घरासमोर टॅक्सी उभी करून फायनान्स कंपनीशी बोलतो आहे कधीचा

डोक्यावर सूर्य घेऊन आलेला मेथीवाला
दोन जुड्या घाईघाईत ढकलून जातो टोपलीत पोलिसांच्या भीतीने

जगाचे सुख खरेदी करून आणलेला बाजारहाट
मिरवत आहे समाधानाचे पदक

ही माणसे कशी झोपवून धरणार आहेत वर्तमानाला
जिथे भविष्याची चादर उसवत चालली आहे अंतरीच्या भुकेने

सभोवताल अस्वस्थतेने पेटलेला असताना
मी राखुन ठेवलेले चार दाणे अंगणात टाकतो पाखरांना
आणि एका झाडाच्या बागेला देतो पाणी
हा ही दिवस कालच्यासारखा निघून जाईल म्हणून.

३.
साहेब,
त्यांना जात-धर्म-वंश-भाषा, स्त्री-पुरुष शिकवू नका
त्यांना एक अख्ख झाड शिकवा

त्यावरची हिरवी पाने
एका अंगाच्या अनेक शाखा बहरलेली फुले
लगडलेली फळे
त्यावर उपजीविका करणारे पक्षी शिकवा
आणि सांगा
पाने फुले फळे गळून गेली,
पक्षी उडून गेले की
उभा राहतो केवळ निष्पर्ण झाडाचा सांगाडा
त्यात खरा माणूस लपून बसलेला असतो.

४.
धुर्‍यावर उभा राहतो तो
अंधाराला चुरगाळून
वावरभर फिरवतो प्रकाशाचा दिवा सावज दडले तरी
मनाचा गोफणगोटा
भिरकवत राहतो अविरत.

५.
दुपारी पाठीवर उन घेऊन जाणारे माणसं
सायंकाळी परततात
आपल्या घरातला हक्काचा उजेड घेऊन
जिभेवर न ठेवता आला एखादा चवदार पदार्थ तरी
डोळ्यांनी तृप्त होण्याची त्यांना झालेली असते सवय

ते फक्त बियाणे पेरत नाहीत काळ्या मातीत
आपलं आयुष्यच पेरतात
म्हणून हिरवळीचा रंग दरवर्षी चढत जातो
व्यापाऱ्यांच्या भिंतीवर

तुम्ही चुकीचं सांगत आला आहात की त्यांच्या अंगातून येतो अत्तराचा वास
खरं तर कस्तुरीचे थेंब वसलेले आहेत त्यांच्या प्रत्येक रंध्रात

रक्त कुठे वाहत त्यांच्या अंगातून? असंख्य नद्यांची सळसळ
दिशादिशांत पसरते
त्यांच्या धमन्यातून
फक्त त्या नितळ प्रवाहाला
दूषित केलं आहे तुम्हीच

मग उगाच कशाला अमानुषतेच्या विहित नमुन्यात
नोंदवत बसता अशा माणसांना?
हे कालही होते, उद्याही राहतील कवितेसारखे
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी.

Leave a Reply