
शंकर खुशालराव लोडे
शंकर लोडे हे कवी, नाट्यकलावंत, कलारसिक म्हणून परिचित आहेत. त्यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १९९१ साली लिपीक म्हणून सेवेला प्रारंभ केला. तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते बँकिंग ऑफिसर ग्रेड-१ या पदावरून मुख्यालयातून सेवानिवृत्त झाले. लहानपणापासूनच त्यांना लिखाण, भजन-गायन आणि अभिनय यांची विशेष आवड आहे. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून घर देता का घर, अंधाधुंद, एक रात्र पावसाळी आणि तांडा या नाटकांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. अंधाधुंद या नाटकातील अभिनयासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्तम अभिनय पुरस्कार प्राप्त झाला आहे. चित्रपट आणि लघुपट क्षेत्रातही त्यांनी आपली छाप उमटवली आहे. हद्द-२ या चित्रपटात त्यांनी राजकीय नेत्याची भूमिका साकारली असून सोन्या, किस्सा टिकट का आणि आखिरी स्टेटस या लघुपटांमध्येही काम केले आहे. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि कला क्षेत्रात ते सक्रिय असून आपल्या बहुआयामी कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. Email : shankarlode7920@gmail.com