
गोपाल शिरपूरकर
गोपाल शिरपूरकर हे संवेदनशील लेखक, कथाकार तसेच साहित्य आणि समाजजीवनाचे व्यासंगी अभ्यासक म्हणून सुपरिचित आहेत. शिक्षणशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलेले शिरपूरकर हे पेशाने उपक्रमशील शिक्षक आहेत. 'माह्यी परदेस वारी' हे प्रवासवर्णन, 'मोहोरपाला' हा स्फुट लेखसंग्रह आणि 'भुईकोर' हा चर्चित व वाचकप्रिय ठरलेला कथासंग्रह ही त्यांची प्रकाशित पुस्तके. प्रवास आणि पुरातत्त्व हे त्यांच्या आवडीचे तसेच अभ्यासाचे विषय. कविता, कादंबरी आणि ऐतिहासिक दस्तावेजीकरण या साहित्य प्रकारांतही त्यांनी केलेले लेखन दखलपात्र ठरले आहे. खुमासदार, ओघवत्या शैलीत समाजमन आणि लोकजीवनाचे सूक्ष्म पदर उलगडण्याची त्यांची हातोटी तसेच नव्या विषयातील जाणीवांचा अर्थपूर्ण शोध घेणे ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये. पूर्व विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील उपक्रमात सातत्यपूर्ण व कृतीशील सहभाग. लेखनासोबतच सामाजिक-सांस्कृतिक चळवळींत सक्रिय.