अविनाश पोईनकर
अविनाश पोईनकर स्तंभ पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक व संचालक आहेत. ते कवी, लेखक, मुक्तपत्रकार तसेच आदिवासी-ग्रामीण विकास क्षेत्रातील कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. ‘उजेड मागणारी आसवे’ हा कवितासंग्रह महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित. ‘विमल गाडेकर : व्यक्ती आणि वाङ्मय’ या ग्रंथाचे संपादन. तसेच ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ हा नक्षलप्रभावित गडचिरोलीतील खाणग्रस्त आदिवासींचे वास्तव मांडणारा संशोधन ग्रंथ आणि ‘दंडकारुण्य’ (लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई) हा कवितासंग्रह प्रकाशित आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक संघर्ष, मानवी संवेदना, पर्यावरणीय भान आणि संविधानिक मूल्यांचा सशक्त प्रत्यय येतो. संविधानिक मूल्यांची जाणीव आणि सामाजिक जागृती रुजवण्याच्या हेतूने ते गेल्या दशकभरापासून जमिनीस्तरावर कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री ग्रामीण विकास फेलो राहिले असून, ग्रामपरिवर्तक म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील घाटकुळ हे गाव राज्यात आदर्श व स्मार्ट ग्राम म्हणून उभे करण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कार्यकर्तृत्वातून महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित इनलैक्स शिवदासानी सामाजिक फेलोशिप, साधना साप्ताहिक संयोजित तांबे–रायमाने अभ्यासवृत्ती, कोरो इंडियाची समता फेलोशिप आदी बहुमान प्राप्त झाले आहेत. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई व भवरलाल जैन फाउंडेशन, जळगावचा कविवर्य ना. धो. महानोर साहित्य पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा वाङ्मय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा युवा पुरस्कार यांसह अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. स्तंभ पब्लिशिंग हाऊसच्या माध्यमातून समाजाभिमुख, मूल्याधिष्ठित, परिवर्तनशील आणि दर्जेदार साहित्यनिर्मितीला चालना देणे, तसेच नव्या पिढीतील लेखकांना सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे त्यांचे प्रमुख ध्येय आहे.
